रुंदे, टिटवाळा येथे देवराई प्रकल्प वर्षपूर्ती सोहळा संपन्न

अहवाल

पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत टिटवाळा, रुंदे येथे सुरु असलेल्या “देवराई” या वनीकरण प्रकल्पाला १२ जानेवारी २०१८ रोजी १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने दि. २५  मार्च २०१८ रोजी रुंदे येथे एक स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमाला एन्व्हायरो विजीलचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनीस, पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विद्याधर वालावलकर आणि डॉ. रघुनंदन आठल्ये, निवृत्त उपवन संरक्षक श्री. अनिल ठाकरे, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर, मुख्य वनसरंक्षक, (ठाणे) श्री. राजेंद्र कदम) आणि  पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव सीमा जोशी ई. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८ वाजता झाली. यावेळी उपस्थित सर्व लोक, प्रमुख पाहुणे आणि ग्रीन लव्हर्स क्लबच्या सभासदांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सचिव सीमा जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती आणि पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नसून आपली परिसंस्था जपणे असे आहे.” हे सांगून नदीकिनारी देशी बाभळीची झाडे लावावीत असे सुचविले.

निवृत्त उपवन संरक्षक श्री. अनिल ठाकरे यांनी आत्तापर्यंत लावलेल्या झाडांच्या वाढीबद्दल सांगून येत्या ४-५ वर्षात आपण या झाडांच्या सावलीत निवांतपणे विश्रांती घेऊ शकतो असे सांगून क्षेत्रपरिसरात ज्या मोकळ्या जागा आहेत तेथे या वर्षात झाडे लावण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयोजन आहे असे सांगितले.

डॉ. अनिल काकोडकर यांनी या उपक्रमासाठी संस्थेचे अभिनंदन करुन “या ठिकाणी एखादी प्रयोगशाळा नक्कीच सुरु करू शकता” असे सुचवले. या प्रकल्पांच्या माध्यमातून येथे राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी व्यवसाय सुरु करु शकतो असेही सांगितले.

यानंतर “आपलं पर्यावरण” या मासिकाचे तसेच देवराई प्रकल्पात वर्षभरात पूर्ण केलेल्या कामाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर देवराई प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक श्री. सुहास पवार यांनी “देवराई हे एक मानवनिर्मित जंगल असून येथे जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड केलेली असून यापुढेही अशाच वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले.

यानंतर डॉ. विकास हजिरनीस यांनी “जंगल आपल्याला अंतर्मुख करायला शिकवते त्यामुळे ही वनश्री शहराला जोडून त्याबाबत स्थानिक लोकांना त्याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे सांगितले. प्रा. विद्याधर वालावलकर यांनी या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. रुंदे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर सर्वांनी पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या मामणोली येथे सुरु असलेल्या संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील प्रकल्पांची माहिती मिळविली.