जागतिक पाणथळभूमी दिन

२ फेब्रुवारी २०१८

पर्यावरण दक्षता मंडळ ही स्वयंसेवी संस्था गेली १८ वर्ष ठाणे शहरात कार्यरत आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने २००५ साली प्रामुख्याने ठाणे खाडीच्या संदर्भात  ‘स्वच्छ खाडी अभियान’ सुरु केले.

पाणथळ जागांविषयी संशोधक, स्थानिक नागरिक, विद्यार्थी व मच्छीमार समाज इ. समाजात जनजागृती घडवण्याचे काम ही संस्था करत आहे. स्वच्छ खाडी अभियान आणि जागतिक पाणथळ भूमी दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक पाणथळ भूमी दिन जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने ठाणे आणि शहर परिसरातील ३० शाळांमध्ये पाणथळभूमी विषयक जनजागृतीचे कार्यक्रम पर्यावरण दक्षता मंडळातर्फे घेण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पाणथळभूमीविषयी अधिक माहिती व्हावी या हेतूने घोषवाक्य बनविण्याची स्पर्धा, पोस्टर बनविणे, पथनाट्य स्पर्धा आणि विडीयो बनवणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला असून याचा बक्षीस समारंभ दि. २ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमात पार पडला.

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नियोजन भवन येथे ठीक ११:३० वा. या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर श्री. सुदाम परदेशी (उपविभागीय अधिकारी, ठाणे), नंदकिशोर देशमुख (महसूल, नायब तहसिलदार), विशाल जाधव, डॉ. संतोष थिटे (उपविभागीय अधिकारी, भिवंडी) श्री. आर. वी. तवटे (नायब तहसीलदार), श्री. धीरज परब, सौ. गीता परदेशी, सौ. दिव्या पाटील (नगरसेविका, मीराभाईंदर) या मान्यवरांसोबतच संस्थेचे डॉ. पुरुषोत्तम काळे (अध्यक्ष), डॉ. प्रसाद कर्णिक (कोशाध्यक्ष), प्रा. विद्याधर वालावलकर (उपाध्यक्ष), संगीता जोशी (सचिव) आणि डॉ. प्रमोद साळसकर (जलतज्ञ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रकल्प समन्वयक कु. सुरभी वालावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले या संपूर्ण उपक्रमाची थोडक्यात रूपरेषा मांडली. यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ. प्रसाद कर्णिक यांनी PPT Presentation द्वारे पाणथळभूमीविषयी सविस्तर माहिती देऊन उपस्थिटांचे मार्गदर्शन केले. २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील ‘रामसर’ या ठिकाणी पाणथळभूमी विषयक पहिली जनजागृती परिषद आयोजित केली गेली होती, तेंव्हापासून दरवर्षी जगभरात २ फेब्रुवारी रोजी “जागतिक पाणथळ भूमी दिवस साजरा केला जातो हे सांगितले. ठाणे खाडी परिसरातील जैवविविधता आणि त्यावर अभ्यास केलेली चित्रफित दाखवताना श्री कर्णिक यांनी गेली अनेक वर्षे ठाणेकरांना खाडीसफारी करविणारे श्री. प्रवीण कोळी यांचा उल्लेख करून त्यांचा सन्मान केला. यानंतर ठाण्यातील ज्ञानोदय पब्लिक स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वीचा विनाश आणि पाणथळभूमीचा ऱ्हास यावर भाष्य करणारे एक पथनात्य सादर केले. वाढते शहरीकरण, जंगलतोड, दुर्मिळ वनस्पतीचा नाश यामुळे होणारे दुष्परिणाम हे प्रबोधनपर पथनाट्य  “हा नाश थांबवा” या सुंदर वसुंधरा गीताने सादर केले.

के. जे. सोमय्या कॉलेजचे प्रा. श्री. चिन्मय खानोलकर यांनी आपल्या PPT Presentation द्वारे केवळ खाडीच्या आजूबाजूची जमीन म्हणजे पाणथळभूमी नाही, हे समजावून सांगताना ‘आपल्या ठाणे खाडीत २००९ मध्ये ६९ प्रकारच्या माश्यांच्या जाती होत्या, त्यापैकी २०१६ च्या सर्वेक्षणानुसार आता केवळ ११ प्रजाती शिल्लक राहिल्या आहेत. यावरून आपल्या खाडीतील जैवविविधतेला किती धोका निर्माण होत आहे हे आपण समजून घेऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे’ असे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोशल मिडीयाचा वापर पाणथळभूमीच्या जनजागृतीसाठी उत्तमरीत्या करता येतो. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन केले. यानंतर “Mangrove-मुंबई के तटरक्षक” हा लघुपट सर्वांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाला ठाणे आणि परिसरातील अनेक शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी युरो स्कूल ठाणेच्या विद्यार्थ्यांनी पाणथळभूमीचा नाश या विषयावर एक सुंदर पथनाट्य सादर करून “पाणथळभूमीच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकजूट होऊया” असे सांगितले. “Jewels of thane creek” या लघुपटातून ठाणे खाडीविषयी माहिती देण्यात आली.

यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचे हस्ते विजेत्यांचे कौतुक करण्यात आले. ठाण्याचे उपविभागीय अधिकारी श्री. सुदाम परदेशी यांनी आपल्या मनोगतात “पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेऊन पर्यावरण दक्षता मंडळाच्यासोबत आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी खाडीचा, पाणथळभूमीचा आणि त्यातील जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या सर्व तज्ञांनी उत्तमरीत्या मार्गदर्शन केले आणि १० खाडी साफारींचे आयोजन करून ठाणेकरांना खाडीचे दर्शन घडविले यांबद्दल सर्वांचेच आभार मानले. ठाण्यातील १०० पैकी ३९ गावे ही खाडीकिनारी आहे त्यामुळे तेथी जैवविविधता जपणे हे केवळ तेथील स्थानिक लोकांचे कार्य नसून ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर यांनी “ पाणथळभूमीचा अभ्यास आत्ताच्या पिढीला करायला मिळत आहे आणि त्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळासारख्या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने आपल्याला काम करायला मिळत आहे यांबद्दल संस्थेचे आभार मानले. कांदळवनांचे संरक्षण हे केवळ निसर्गाचे संरक्षण नाही तर आपले स्वतःचे रक्षण करणे आहे असून सांगून नैसर्गिक संकटाना तोंड देण्यासाठी खारफुटीची झाडे, त्यांचे संवर्धन आणि पाणथळभूमीचे संरक्षण आपण केले पाहिजे असे सांगितले. ठाणे शहरातील जैवविविधता अधिक चांगल्या प्रकारे जपली आणि संवर्धन केली जाईल या हेतून “eco tourist point” लवकरच पर्यावरण दक्षता मंडळाच्या मदतीने केला जाईल असे सांगून त्याविषयी पुढील कामकाज लवकरात लवकर होण्यासाठीची पहिली बैठक याच आठवड्यात घेण्यात येईल असेही सांगून आभार मानले. माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते “ठाणे खाडी आणि परिसरातील जैवविविधतेचे दर्शन घडवणारी चित्रप्रदर्शनी” नियोजन भवनाच्या आवारात मांडण्यात आली होती. याचाही सर्व उपस्थितांनी लाभ घेतला.

शेवटी कार्यक्रमाचा समारोप सौ. पौर्णिमा भोसले यांनी सर्वांचे आभार मानून केला. राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता झाली.